नवी दिल्ली : २००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित याच्यासह अन्य आरोपींच्या जामीन अर्जांवर एक महिन्याच्या आत विचार करण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक न्यायालयाला दिले आहेत. या निर्णयामुळे प्रज्ञासिंग, पुरोहित व अन्य आरोपींची जामिनावर सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. या सर्वांविरुद्ध ‘मकोका’ लावण्यात आला आहे.राकेश धावडे हा आरोपी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आधीही अशाच प्रकारच्या अन्य गुन्ह्यात सामील असल्याकारणाने त्याला वगळून अन्य सर्व आरोपींचे जामीन अर्ज निकाली काढताना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) कठोर तरतुदींचा विचार करण्यात येऊ नये, असे न्या. एफ. एम. आय. कलिफुल्ला आणि न्या. शिवा कीर्ती सिंग यांच्या पीठाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
साध्वी प्रज्ञासिंग यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 16, 2015 1:43 AM