ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २९ - केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( दुकाने आणि आस्थापना) कायद्याला मंजुरी दिल्याने आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार आहेत. या कायद्यामुळे दिवसा काबाडकष्ट करणा-या सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाइफ अनुभवता येऊ शकते. कारण उच्चभ्रूंसाठी नाइटलाइफ नवीन नाही, त्यांचा दिवस रात्रीच सुरु होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्री हॉटेल्स, दुकाने चालू ठेवण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्रीमंडळाने मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस) कायद्याला मंजुरी दिल्याने रेस्टॉरंट्स्, दुकानेस बँका, मॉल्स, आयटी फर्म्स इत्यादी वर्षभर दिवसरात्र त्यांच्या सोयीनुसार सुरू राहू शकतात. दरम्यान या कायद्यानुसार महिलांनाही पुरशा सुरक्षा व्यवस्थेच्या सहाय्याने रात्रपाळीत काम करता येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कर्मचा-यांना पिण्याचे पाणी, कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृहे आदि सोयी सुविधाही उपलब्ध होणार आहेत.
आणखी वाचा :
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबत आग्रही भूमिका घेतली होती. मुंबई रात्रभर जागी असते. उद्योग आणि सेवाक्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे लाइफ बदलत चालले आहे. त्यामुळे कॅफे, दूध केंद्रे, केमिस्ट, मॉल, खाण्याची ठिकाणे रात्री खुली ठेवावी, असा प्रस्ताव आदित्य ठाकरेंनी मांडला होता. मुंबईतील अनिवासी भाग, काळा घोडा, नरिमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला संकुल, मॉल आणि मनोरंजनाची ठिकाणे यांना विशेष करमणूक विभाग म्हणून जाहीर करण्याची सूचनाही आदित्य यांनी या प्रस्तावाद्वारे महापालिकेला केली होती.
गृहविभागाने दर्शवला होता विरोध
गृहविभागाने मात्र मुंबईतील नाइटलाइफला विरोध दर्शवला होता. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस दलावरील ताण वाढेल, अशी भूमिका गृहविभागाने घेतली होती. मुंबई शहरातील नाईट लाईफ ही संकल्पना विशिष्ट उच्च वर्गासाठी आहे़ सामान्य माणसाच्या जीवनाशी हा विषय निगडीत नाही़ नाईट लाईफचा गैरफायदा असामाजिक घटक अधिक प्रमाणात घेऊ शकतात, अशी शंका गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.