दार्जिलिंग : भाजपच्या राजवटीत देशाचे स्वातंत्र्य व राज्यघटना यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.
येथील प्रचारसभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दार्जिलिंगमध्ये काही प्रश्नांवरून असंतोष निर्माण झाला आहे. भाजप त्याचा राजकीय फायदा घेऊ पाहात आहे. त्या प्रश्नांचे भांडवल करून निवडणुकांमध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रकार भाजपने केला आहे. जेवढी या प्रश्नांची धग वाढेल तितका त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल असा या पक्षाचा विचार आहे. दार्जिलिंग, कालिमपाँग, मिरिक आदी विभागांचा उत्तम विकास व्हावा असे भाजपला वाटत नाही. दार्जिलिंगमधील भाजपचे विद्यमान खासदार एस. एस. अहलुवालिया यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर या भागाला कधीही भेट दिली नाही. त्यांनी विकासाची कामे केली नाहीत.
भाजपच्या राजवटीत गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लोकांना विसर पडला आहे. देशामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. विद्वेषाचे राजकारण सुरू आहे. यामुळे देशाच्या ऐक्यालाही धोका निर्माण झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)मोदी स्वप्रसिद्धीत मग्नमोदी यांची खिल्ली उडविताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ची प्रसिद्धी करण्यातच मग्न आहेत.मोदी हे इतके महान नेता बनलेत की त्यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनू लागले आहेत. त्यांच्या नावे नमो दुकाने उघडली असून त्यात नमो सुट विकत मिळतात. या दुकानांमध्ये नमो स्लीपरही विकत मिळतील.