"लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे थेट उत्तम पोलीस व्यवस्थेशी जोडलेलं आहे. यामध्ये सातत्यानं सुधारणा करण्याची हरज आहे. पोलीस व्यवस्थेच्या पाया म्हणजे बीट कॉन्स्टेबल, सामान्य व्यक्तीचं संरक्षण करून लोकशाही यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे," असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या ५१ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. जर कायदा आणि व्यवस्था चांगली नसली तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नसल्याचंही ते म्हणाले.
"लोकशाही हा आमचा स्वभाव आहे. स्वातंत्र्यापूर्वीही हे आमचं चरित्र होते आणि स्वातंत्र्यानंतर आम्ही ते स्वीकारलं. हा आपल्या लोकांचा स्वभाव आहे. लोकशाहीत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य," असं शाह म्हणाले. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा थेट संबंध कायदा आणि सुव्यवस्थेशी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
लोकशाही केवळ पक्षांना मत देणं आणि सरकार तयार करण्याबाबत नाही. ते केवळ एका व्यवस्थेचा भाग आहे. लोकशाही यशस्वी करण्याचं फलित काय? याचा परिणाम असा झाला की देशातील १३० कोटी लोक स्वतः त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेनुसार स्वत:ला विकसित करण्यासाठी काम करत आहोत, ज्यामुळे देशाला फायदा होता," असंही ते म्हणाले.
"कायदा, सुव्यवस्था चांगली नसेल तर लोकशाही समृद्ध होऊ शकत नाही"देशात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसेल तर लोकशाही समृद्ध होऊ शकत नाही यावरही त्यांनी भर दिला. "हे काम पोलीस आणि सुरक्षा दलांकडून करण्यात येतं. एक यशस्वी लोकशाहीसाठी कोणत्याही व्यक्तीची सुरक्षा निश्चित व्हावी हे महत्त्वाचं आहे. नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार अखंडपणे मिळत राहिले पाहिजेत. तसंच संविधानानुसार नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असावं," असंही त्यांनी नमूद केलं.