- सुरेश भटेवरानवी दिल्ली : राफेलवरून लोकसभेत भाजपची काँग्रेससह विरोधकांशी चकमक बुधवारी पहायला मिळाली. राज्यसभेत गुरूवारी त्याचे अनपेक्षित पडसाद उमटले. प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, भारत दौऱ्यावर आलेल्या फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांशी राफेलबाबत कोणतीही चर्चा झाली नाही मात्र त्यांनी राफेलबाबत भारताच्या सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. सुषमा स्वराजांच्या उत्तरात कमालीचा विरोधाभास आहे. राफेलवर फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्याशी स्वराज यांचे बोलणेच झाले नाही तर मग त्यांनी आनंद व्यक्त कशासाठी केला. त्याचे कारणच काय? असा सवाल विचारीत काँग्रेसने राज्यसभेत सभात्याग केला.शिवसेनेच्या संजय राऊत यांनी फ्रान्सच्या भारत दौºयाबाबत प्रश्न विचारला होता. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्या दिवशी भारतात आले त्याच दिवशी राफेलबाबत सुप्रिम कोर्टाचा निकाल आला. स्वराज म्हणाल्या, निकालाबाबत फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला मात्र या मुद्यावर त्यांच्याशी चर्चा झाली नाही. काँग्रेस उपनेते आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे तत्कालिन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या दरम्यानच्या बैठकीचे मिनिटस् आपण सभागृहापुढे ठेवाल काय? याचे कारण उभयतांमधे झालेली चर्चा बरीच वादग्रस्त ठरली आहे.
फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चाच झाली नाही, तर त्यांनी आनंद कसा व्यक्त केला?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 3:16 AM