नवी दिल्ली : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे अनेक खटले असूनही विकास दुबेसारखा कुविख्यात गुंड वारंवार जामिनावर सुटावा, हे व्यवस्थेचे अपयश आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दुबे व त्याच्या साथीदारांच्या ‘एन्काऊंर’च्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाची फेररचना करून त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाचाही समावेश करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
दुबे आणि साथीदारांच्या ‘एन्काऊंटर’ची नि:पक्ष चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी यासाठी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. त्यावर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्मा व न्या. व्ही. रमासुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
दुबे उज्जैनमध्ये शरण आला नव्हता व त्याचे ‘एन्काऊंटर’ही बनावट नव्हते, असे ठाम प्रतिपादन उत्तर प्रदेश सरकारने प्रतिज्ञापत्र करून केले आहे. त्या सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, दुबेवर एकूण ६५ खटले होते व त्याच्या घरी आठ पोलिसांचे हत्याकांड झाले तेव्हा तो पॅरॉलरवर सुटून आलेला होता. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, एवढे खटले असलेला जो गुंड गजाआड असायला हवा तो वांरवार जामिनावर सुटू शकतो, हे व्यवस्थेचे अपयश आहे. या परिस्थितीने आम्ही खूप उद्विग्न आहोत.
दुबे व त्याच्या पाच साथीदारांच्या ‘एन्काऊंटर’च्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. शशिकांत अग्रवाल यांचा एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला आहे. तसेच दुबेची गुन्हेगारी आणि त्याला पोलीस व राजकारण्यांकडून मिळालेली संभाव्य साथ याच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटीही’ नेमल्याचे मेहता यांनी सांगितले.
त्यासंदर्भात सरन्यायाधीश म्हणाले की, चौकशी अलाहाबाद येथे होणार आहे व तुम्ही नेमलेले न्यायाधीश बाहेरचे आहेत. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात त्यांनी अलाहाबादला जाऊन चौकशी करण्यापेक्षा एखादा स्थानिक न्यायाधीश नेमणे अधिक श्रेयस्कर झाले असते. शिवाय या चौकशी आयोगात सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त न्यायाधीशाची व एका वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचीही नियुक्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.
च्कानपूर : दि. ३ जुलै रोजी अटक करण्यासाठी घरी आलेल्या आठ पोलिसांना गोळ्या घालून ठार करणाºया आणि त्यानंतर आठवडाभराने पळून जाताना पोलिसांच्या कथित ‘एन्काऊंटर’मध्ये मारल्या गेलेल्या विकास दुबे या अट्टल गुंडाच्या आणखी दोन साथीदारांना अटक केली. च्त्यांची नावे जयंत वाजपेयी व प्रशांत शुक्ला अशी दिली गेली आहेत. हत्याकांडाच्या दोन दिवस आधी दुबेने या दोघांना फोन करून बोलावून घेतले होते व त्यांनी दुबेला दोन लाख रुपये व २५ रिव्हाल्व्हर दिली. पळून जाण्यासाठी त्यांनी दुबेला तीन मोटारीही पुरविल्या.