मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. शनिवारी जिरीबाम जिल्ह्यातील एका गावावर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी हिंसाचार उसळला. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांनी पहाटे ५ वाजता बोरोबेकरा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका गावाला आधुनिक शस्त्रांनी लक्ष्य केले. अतिरेक्यांनी बॉम्बस्फोटही केले. यादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
याचबरोबर, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. ज्यावेळी हा हिंसाचार उसळला, त्यावेळी सुरक्षा दलाने वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविले. जिरीबाम शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बोरोबेकरा घनदाट जंगलांनी वेढलेले आणि डोंगराळ भाग आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यात जातीय हिंसाचार भडकल्यानंतर या भागात असे अनेक हल्ले झाले आहेत.
शांततेसाठी बैठकदरम्यान, मणिपूर गेल्या एक वर्षाहून अधिक काळ हिंसाचाराच्या आगीशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मैतई, कुकी आणि नागा समाजाच्या आमदारांमध्ये चर्चेसाठी नवी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण १७ आमदारांनी सहभाग घेतला होता. यापैकी ९ मैतई समाजातील, ५ कुकी समाजातील आणि ३ नागा समाजातील होते. या बैठकीच्या काही दिवसांनीच हा हिंसाचार पाहायला मिळाला.
२०० हून अधिक लोकांचा मृत्यू मैतई, कुकी आणि नागा समाजाची पहिल्यांदाच बैठक झाली होती, ती ४ तास चालली. मात्र, या बैठकीत काय निर्णय झाला, हे समोर आले नाही. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात २०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच, नुकत्याच झालेल्या बैठकीत कुकी आमदारांनी मणिपूरच्या आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र प्रशासन किंवा केंद्रशासित प्रदेश या मागणीचा पुनरुच्चार केला.