Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचे वातावरण दिसून येत आहे. शनिवारी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचुप भागातील कौत्रुक गावात झालेल्या गोळीबारात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर एका मुलीसह चार जण जखमी झाले आहेत. तसेच, संशयिताने ड्रोनद्वारे बॉम्बने हल्ला केल्याचेही सांगण्यात येत आहे.
कौत्रुक गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, संशयित सशस्त्र अतिरेक्यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. गावातील स्वयंसेवक संवेदनशील भागापासून दूर असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात सुरबला देवी (३३) या महिलेचा मृत्यू झाला. हल्ल्याच्या घटनेनंतर सुरबला देवी यांना तातडीने इम्फाळच्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरबला देवी यांना मृत घोषित केले.
सुरबला देवी यांची १३ वर्षांची मुलगी एनजी रोजिया हिच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून सध्या तिच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, जखमींमध्ये ३० वर्षीय पोलीस अधिकारी ॲन रॉबर्ट यांचाही समावेश आहे, जे अवांग खुनौ मानिंग लेईकाई येथील रहिवासी आहे. इतर दोन जखमी इनाओ ताखेलांबम आणि थाडोई हेगरुजम यांना राज मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
इंफाळ पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी स्थानिक प्रशासनाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच, मणिपूर सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मणिपूर गृह मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "राज्य सरकारला ड्रोन, बॉम्ब आणि अनेक अत्याधुनिक शस्त्रे वापरून कौत्रुक गावकऱ्यांवर हल्ला करण्याच्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये कथितपणे कुकी अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात एका महिलेसह दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत."
मुख्यमंत्र्यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून कुकी समुदाय उतरला होता रस्त्यावरदरम्यान, शनिवारी कुकी-जो समुदायाच्या लोकांनी आदिवासी बहुल भागात तीन रॅली काढल्या. या रॅलींमध्ये कुकी-जो समुदायाने वेगळ्या प्रशासनाची मागणी केली. तसेच, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे. कुकी-जोच्या वतीने या रॅलींचे आयोजन आदिवासी बहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि तेंगनौपाल जिल्ह्यांतील अनुक्रमे लीशांग, कीथेलमनबी आणि मोरेह येथे करण्यात आले होते. कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि झोमी स्टुडंट्स युनियनने पुकारलेल्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.