Prophet Row : भाजपतून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या ल्नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशात सुरू झालेला हिंसक निदर्शनांचा प्रकार अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही. पश्चिम बंगालमधील हावडा येथे झालेल्या हिंसाचारानंतर रविवारी नादिया जिल्ह्यात निदर्शनाला हिंसक वळण लागले. नादिया जिल्ह्यातील बेतुआधारी रेल्वे स्थानकावर सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने रेल्वेवर हल्ला केला. लोकांनी ट्रेनवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर स्थानकावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच काही रिपोर्ट्सनुसार काही समाजकंटकांनी आसपासच्या दुकानांचंही नुकसान केलं.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने आंदोलक रस्ता अडवत होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता काही जण रेल्वे स्थानकात घुसले आणि त्यांनी रेल्वेवर दगडफेक सुरू केली. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे लालगोला मार्गावरील सेवा ठप्प झाली. पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातही हिंसाचार झाला आहे.