"मला एक सहकारी सांगत होते, लव्ह जिहाद हा शब्द सर्वप्रथम झारखंडमध्ये आला आहे. आपल्या देशात रविवारी सुट्टी असते. तेव्हा येथे इंग्रजांचे राज्य होते. यामुळे ख्रिश्चन समाज सुट्टी (रविवारची) साजरी करतो. रविवारचा हिंदूंशी संबंध नाही. तो ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. हे 200-300 वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता, यांनी एका जिल्ह्यात रविवारच्या सुट्टीला टाळे ठोकले आणि शुक्रवारची सुट्टी असेल, असे सांगितले. आता ख्रिश्चनांसोबतही भांडण?" असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर (JMM) जोरदार हल्ला चढवला. ते झारखंडमधील दुमका येथे प्रचारसभेत बोलत होते.
मोदी म्हणाले, राज्यात एवढे सुंदर पर्वत आहेत, मात्र, चर्चा होते नोटांच्या डोंगरांची. काँग्रेस आणि झामुमोला केवळ व्होट बँकेची चिंता आहे. काँग्रेस गरीबांच्या नावाने पैसे लोटते, मोदीने हे सर्व बंद केले आहे. आम्ही जनतेच्या पैशांचा वापर जनतेच्या भल्यासाठी करतो. जनतेसाठी सातत्याने काम करत असतो.
भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, 4 जूननंतर भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी वेगाने कारवाई होईल, ही मोदीची गॅरन्टी आहे. विरोधी आघाडी असलेल्या 'I.N.D.I.A.'चे काही होणार नाही. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.