नवी दिल्ली , राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२नुसार जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हय्याकुमारने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी जामीन अर्ज केला असून, त्याची सुनावणी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी होणार आहे. कन्हय्याचे ज्येष्ठ वकील सोली सोराबजींच्या वतीने अॅड. राजू रामचंद्रन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. कन्हय्या निर्दाेष असल्याचे त्याच्या वकिलांनी याचिकेत नमूद केले आहे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला निर्दाेषच मानले पाहिजे, हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. तथापि पटियाला हाउस कोर्टाच्या परिसरात वकिलांचा एक गट मारझोड करीत त्याच्या जिवावर उठला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला आणि त्याच्या वकिलांना पटियाला हाउस कोर्टात कोर्ट क्रमांक ४पुरती मर्यादित सुरक्षा दिली आहे. मात्र त्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे तिथे कन्हय्यावरील आरोपांची सुनावणी अशक्य आहे, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी सुभाष चंद्रन यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली. मारहाण करणाऱ्या आरोपी वकिलांविरुद्ध त्वरित एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पटियाला हाउस कोर्टाच्या परिसरात बुधवारी वकिलांनी घातलेल्या हैदोसाची चौकशी करण्यासाठी ६ ज्येष्ठ वकिलांच्या पथकाने आपला अहवाल आज न्या. जे. चेलमेश्वर यांच्या खंडपीठाकडे सादर केला.
कन्हय्याच्या जामिनावर शुक्रवारी निर्णय
By admin | Published: February 19, 2016 3:44 AM