ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - मित्रामुळे एचआयव्हीची लागण झाल्याने दिल्लीत एका वाहनचालकाने वचपा काढण्यासाठी मित्राच्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या हत्येची गुंता उलगडला असून पोलिसांनी मारेकरी वाहनचालकाला अटक केली आहे.
दिल्लीतील रोहिणी येथे २१ एप्रिल रोजी एका महिलेची निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येमागे श्याम नामक वाहनचालकाचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र श्याम पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. अखेरीस काही दिवसांपूर्वी श्यामला बिहारमधील मूळगावातून अटक करण्यात आली. श्यामला पोलिसांनी दिल्लीत आणून कसून चौकशी केली असता या हत्येचा खुलासा झाला व पोलिसही चक्रावून गेले. श्याम व अनिल हे दोघेही वाहनचालक असून दोघेही मुळचे बिहारचे होते. श्याम काही महिन्यांपूर्वी किडनीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेला असता त्याला एचआयव्ही झाल्याचे समजले. श्याम हा वारांगनेकडे गेला होता व तिच्याकडूनच त्याला एचआयव्हीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. अनिलने त्याच्या मित्रमंडळींमध्ये श्यामला एचआयव्ही झाल्याची माहिती पसरवली व मीच त्याला जाणूनबुजून एचआयव्हीबाधीत वारांगनेकडे पाठवल्याचे अनिलने सर्वांना सांगितले होते. ही माहिती श्यामला समजली व त्याने अनिलला धडा शिकवण्याचा निर्धार केला. काही दिवसांनी अनिल त्याच्या गावी गेला असता श्यामने अनिलच्या आईची हत्या केली. श्यामची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.