आज सायंकाळी भारताचे चंद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या या मोहीमेवर लागलेले आहे. आजवर कुठलाही देश चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पाऊल ठेवू शकलेला नाही. रशियाचे लुना-25 दुर्घटनाग्रस्त झाल्याने, या जटिल मिशनसंदर्भात सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली आहे. असे असतानाही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ चंद्रयान-3 चंद्रावर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. या मिशनमध्ये 2019 मध्ये पाठवण्यात आलेल्या चंद्रयान-2 चे ऑर्बिटरही भारताची मदत करत आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, चंद्रयान-2 मिशनमध्ये रशियाही भारताचा भागिदार होता. मात्र, इस्रोला याची मोठी किंमत मोजावी लागली होती.
रशियातून येणार होतं चंद्रयान-2 चं लँडर -इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे लूना-25 शनिवारी चंद्राच्या पृष्ठभागावर दुर्घटनाग्रस्त झाले. या अंतराळ यानाला असलेल्या लँडरचे एक जुने व्हेरिअंट भारताच्या चंद्रयान-2 सोबत जाणार होते. मात्र असे होऊ शकले नव्हते. चंद्रयान-2 मिशनमध्ये एक लँडर आणि रोव्हर सामील होते. जे 2011-12 मध्येच लॉन्च करण्यात येणार होते. तेव्हा भारताने आपले लँडर आणि रोव्हर विकसित केलेले नव्हते. खरे तर, चंद्रयान-2 हे अंतराळ यान रशियासोबत संयुक्तपणे विकसित करण्यात आले होते. यात भारताला रॉकेट आणि ऑर्बिटर उपलब्ध करायचे होते. तर लँडर आणि रोव्हर रशियातून येणार होते.
चंद्रयान-2 मिशनमधून कसा बाहेर पडला रशिया? - चंद्रयान-2 साठी रशिया ज्या प्रकारचे लँडर आणि रोव्हर तयार करत होते, त्यात एका वेगळ्या मिशनवर काही समस्या दिसून आली. यानंतर, रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोसला लँडरच्या डिझाइनमध्ये काही बदल करावे लागले. मात्र नवे डिझाईन मोठे असल्याने ते भारतीय यानात सेट केले जाऊ शकत नाव्हते. यामुळे रशिया चंद्रयान-2 मिशनमधून बाहेर पडला आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रोला स्वदेशी लँडर आणि रोव्हर विकसित करण्याच्या कामाला लागावे लागले. यासाठी भारताला तब्बल 7 वर्ष लागली आणि नंतर चंद्रयान-2 हे 2019 मध्ये लॉन्च केले जाऊ शकले.