नवी दिल्ली - आज जगभरात फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा होत आहे. सर्वजण आपल्या मित्रपरिवाराला शुभेच्छा देत आहेत. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा मित्र समजल्या जाणाऱ्या इस्राइलने भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतात असलेल्या इस्राइलच्या दूतावासाने फ्रेंडशिप डे निमित्त विशेष ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भेटीच्या छायाचित्रांचा व्हिडीओ असून, त्याच्यामागे शोले या प्रसिद्ध चित्रपटातील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या गीताचे संगीत वाजत आहे.
दरम्यान, या ट्विटमध्ये इस्राइली दूतावासाने म्हटले आहे की, "भारताला 'फ्रेंडशिप डे' च्या शुभेच्छा. आमची जुनी मैत्री अजून मजबूत होवो, नव्या उंचीपर्यंत जावो. ये दोस्ती हम नही तोडेंगे." या ट्विटसमोर भारत आणि इस्राइलचे ध्वजही लावलेले आहेत. तसेच #growingpartnership हा हँशटँगही देण्यात आला आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे छायाचित्र नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाच्या तेल अविव येथील मुख्यालयावर झळकले होते.