चेन्नई, दि. ६ - आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा गेम खेळताना भारतातही काही मुलांनी आत्महत्या करून आपला जीव गमावला आहे. दरम्यान, मरणाच्या टोकापर्यंत नेणारा हा गेम खेळण्यापासून परावृत्त करण्यात आलेल्या एका तरुणाने ब्ल्यू व्हेल गेम खेळतानाचा आंगावर काटा आणणारा अनुभव कथन केला आहे. तामिळनाडूमधील कराईकल जिल्ह्यातील अलेक्झँडर मंगुलिवा या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ब्ल्यू व्हेल खेळाच्या जाळ्यातून बाहेर काढले आहे. आता हा खेळ खेळू नका असे आवाहन तो इतरांना करत आहे. ब्ल्यू व्हेल गेम खेळताना आलेल्या थरारक अनुभवाबाबत मंगुलिवा म्हणतो, आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी एक व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. दोन आठवड्यांपूर्वी या ग्रुपमध्ये मला ब्ल्यू व्हेल गेमसंदर्भातील एक लिंक मिळाली. सुट्टी घेऊन नेरावी या माझ्या गावी आलो असताना मी हा गेम खेळण्यास सुरुवात केली. मात्र हा गेम खेळण्यास सुरुवात केल्यावर मी चेन्नईत कामावर माघारी गेलो नाही."" हा असा खेळ आहे ज्याचे अॅडमिन गेम खेळणाऱ्या व्यक्तीच्या हिशेबाने तो तयार करतात. यात असे टास्क दिले जातात. जे रात्री दोन वाजल्यानंतर पूर्ण करणे आवश्यक असते. सुरुवातीचे काही दिवस मला वैयक्तिक माहिती आणि फोटो टाकण्यास सांगितले गेले. त्यानंतर एकेदिवशी मध्यरात्री स्मशानात जाऊन ऑनलाइन सेल्फी काढण्यास सांगितले गेले. "या गेममधील पुढील टास्कमध्ये काही भयावह चित्रपट बघण्यास सांगितले गेले. या गेमच्या प्रभावामुळे मी घरातल्या लोकांशी बोलणे बंद केले. स्वत:ला खोलीत कोंडून घेण्यास सुरुवात केली. या खेळाने हळुहळु माझ्या मेंदूचा ताबा घेतला होता. मला हा खेळ खेळणे बंद करायचे होते. पण मी तसे करू शकलो नाही."सुदैवाने अलेक्झँडरचे बदललेले वर्तन त्याच्या भावाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखून यासंदर्भातील कल्पना पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने सूत्रे हलवत अलेक्झँडरच्या घरी दाखल झाले. तेथे त्यांनी हातावर चाकूने मासा काढत असताना अलेक्झँडरला पकडले आणि त्याचे समुपदेशन सुरू केले. आता तो इतरांना हा खेळ खेळू नका असे आवाहन करत आहे.
काय आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम?ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून 2013मध्ये रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. फिलिपनं लोकांसोबत विशेष करुन 20 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना टार्गेट करुन त्यांच्यासोबत ऑनलाइन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. याद्वारे तो लोकांना स्वतःबाबत माहिती देण्यास सांगायचा, स्काइपवर त्यांच्यासोबत बोलायचा. यावेळी तो कमकुवत लोकांची निवड करायचा. लोकांची निवड झाल्यानंतर अॅडमिन खेळाडूंना रोज एक टास्क देतात, हा टास्क 50 दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो. गेमची सुरुवात सोप्या टास्कने होते. मात्र यानंतर कठीण-कठीण टास्क दिले जातात. टास्कमध्ये हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते. प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.
यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते. एक-एक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या स्वरुपात पुरावा द्यावा लागतो त्यानंतरच खेळाडू पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो.