प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. बंगळुरूच्या डोड्डाबल्लापुरामध्ये राहणाऱ्या श्रीकांत बोलापल्ली यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया... दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रीकांत यांनी यशस्वीपणे शेती करून दाखवली आहे. आता ते ओम श्री साईं फ्लॉवर्सचे मालक आहेत. फुलशेतीशी संबंधित दरवर्षी त्यांचा 60-70 कोटींचा व्यवसाय आहे.
सध्या 50 एकर जमीन आहे. 50 एकर जमिनीवर ते 10 एकर सिमला मिरची लागवडीसाठी ठेवतात. तर श्रीकांत उर्वरित 40 एकर जमिनीवर गुलाबासारख्या विविध प्रकारच्या फुलांची लागवड करतात. आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्यांनी तीन वर्ष आपलं शिक्षण सोडलं. त्यांच्या कुटुंबावर कर्ज होतं. मात्र लवकरच त्यांना आशेचा किरण दिसू लागला.
1995 मध्ये त्यांना बंगळुरूला जाण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी त्यांच्या मूळ गावातील खासदाराने आयोजित केलेल्या फुलशेतीची माहिती घेतली. येथून त्यांचे आयुष्य बदललं. श्रीकांत यांनी शेतीच्या हायटेक पद्धती शिकल्या आणि यशाची नवीन दारे त्याच्यासमोर उघडली. यानंतर त्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक आणि हायटेक शेतीचा अवलंब केला.
श्रीकांत सांगतात, 'फार्ममध्ये पॉली हाऊस, ठिबक आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टिम आणि सोलर पॅनल आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाने माझ्या शेतीच्या कार्याची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण याआधी त्यांनी एका ठिकाणी काम केलं होतं जिथे त्यांना दिवसाचे 18 तास काम केल्यावर फक्त 1000 रुपये मिळायचे.
तुटपुंज्या उत्पन्नात श्रीकांत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नव्हते. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी फुलांच्या व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. श्रीकांत केवळ 18,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने या व्यवसायात उतरले. श्रीकांत यांना पहिल्या वर्षीच पाच लाखांचा नफा झाला. कालांतराने, त्यांच्या चिकाटीने आणि समर्पणामुळे त्यांना 50 कोटी रुपयांचे व्यवसायाचे लक्ष्य गाठता आले.
2010 मध्ये व्यवसायातून मिळालेले उत्पन्न जमीन खरेदीत गुंतवले. त्यामुळे फुलांची लागवड करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. जिद्द आणि मेहनतीने त्यांनी आपली शेती 10 एकरांवरून 50 एकरपर्यंत वाढवली. श्रीकांत शेतीत आवड आणि समर्पण यावर भर देतात. त्यांच्या मते, तुम्ही जे काही कराल, ते करण्यात तुम्हाला रस असायला हवा.