नवी दिल्ली - २०२३ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात १९ जूनपर्यंत सरकारला फास्टटॅगच्या माध्यमातून २८,१८० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. २०२१ ते २०२२ या काळात फास्टटॅगमधून येणाऱ्या कमाईत ४६ टक्के वाढ झाली. ३४७७८ कोटींहून ५०,८५५ कोटी रुपये सरकारला नफा झाला. मागील ५ वर्षात म्हणजे २०१७ ते २०२२ या काळात FastTag मधून मिळणारा महसूल दुप्पट झाला आहे.
२०२१ मध्ये फास्टटॅग हे सर्व वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे कलेक्शनमध्ये ही वाढ झाल्याचे दिसून येते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार, मे २०२३ पर्यंत देशात एकूण ७.०३ कोटी वाहनांना फास्टटॅग आहे. २०१९ नंतर फास्टटॅगमध्ये वेगाने वाढ झाली. २०१९ मध्ये देशात केवळ १.७० कोटी वाहनांना फास्टटॅग लावण्यात आले होते.
सर्वात जास्त टोल प्लाझा कोणत्या राज्यात?देशात ९६४ हून अधिक टोल प्लाझा आहेत जिथं फास्टटॅग सिस्टीम लावली आहे. त्यात सर्वात जास्त टोल प्लाझा मध्य प्रदेशात आहे. इथं एकूण १४३ टोला प्लाझावर फास्टटॅगने वसुली केली जाते. तर दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश आहे. ज्याठिकाणी ११४ टोल प्लाझावर फास्टटॅगने वसुली होते. महाराष्ट्रात ८४ टोल प्लाझा आहेत. तेलंगणा ५१, कर्नाटक ७७, तामिळनाडू ६९, आंधप्रदेश ६०, राजस्थान १०४ टोलप्लाझा आहेत.
फास्टटॅग हे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टिम आहे. रेडिया फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीवर फास्टटॅग काम करते. प्रत्येक फास्टटॅगला वाहनाचे रजिस्ट्रेशन डिटेल्स जोडलेले असतात. फास्टटॅग लावल्याआधी टोल प्लाझावर थांबून टोलचे रोकड पैसे भरावे लागत होते. मात्र फास्टटॅग आल्याने टोल प्लाझावर वाहनांची गर्दी कमी होऊन वाहनचालकांच्या वेळेची बचतही झाली.
Fastag कुठे खरेदी करू शकता? देशात कुठल्याही टोल प्लाझावर तुम्ही फास्टटॅग खरेदी करू शकता. त्याशिवाय एक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, कोटक बँकेच्या शाखेतही तुम्ही खरेदी करू शकता. पेटीएम, Amazon Pay, Google Pay, PhonePe यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही तुम्हाला फास्टटॅग मिळेल. फास्टटॅग हे तुमच्या अकाऊंटशी लिंक असते. एकदा फास्टटॅग खरेदी केल्यानंतर ५ वर्षापर्यंत हे स्टिकर व्हॅलिड असते. ५ वर्षानंतर स्टिकर बदलावे लागते.