नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अज्ञात युरोपीय नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी काही युरोपियन नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवा बदलली आहे, ती अहंकारी झाली आहे, अशी टीका केली होती.
राहुल गांधीनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना एस. जयशंकर म्हणाले की, भारतीय परराष्ट्र मंत्रालयामध्ये झालेला बदल आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. हो भारतीय परराष्ट्र मंत्रालय बदललं आहे. ते सरकारच्या आदेशांचं पालन करते. ते दुसऱ्यांच्या तर्कांना विरोध करते. याला अहंकार नाही म्हणत तर आत्मविश्वास म्हणतात. त्यामधून राष्ट्रहिताचं संरक्षण करतो.
लंडनमध्ये आयडियाज फॉर इंडिया संमेलनामध्ये राहुल गांधींनी विविध मुद्द्यावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. तसेच भारतामध्ये शक्तिशाली लोक, एजन्सी संस्थांवर हल्ला करत आहेत. तसेच त्यावर कब्जा करत आहेत.
संवाद सत्रादरम्यान, राहुल गांधींनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका केली. राहुल गांधीनी सांगितले की, मी युरोपच्या काही नोकरशाहांशी बोललो, ते सांगत होते की, भारतातील परराष्ट्र सेवा पूर्णपणे बदलली आहे. ते काही ऐकत नाहीत. अहंकारी झाले आहेत. कुठल्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत.