नवी दिल्ली : इंदौरजवळ असलेले महू (डॉ. आंबेडकरनगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मठिकाण ते लंडनमधील त्यांचे निवासस्थान, देशभरातील स्टेडियम असोत किंवा रेल्वे स्थानके, कॉलेज, रुग्णालये आणि त्यांचे भव्य पुतळे ही त्यांची स्मृतिस्थळे म्हणजे आज राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांचा वारसा सांगणारे प्रमुख साक्षीदार आहेत.
राज्यघटना तयार होईपर्यंत डॉ. आंबेडकर यांनी घेतलेले कष्ट त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरवतात. डॉ. आंबेडकर यांच्या १००व्या जयंतीदिनी १९९१ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महू येथे भव्य स्मारक उभे केले आहे. नागपूरची दीक्षाभूमी, दादर येथील चैत्यभूमी, ही दोन्ही स्मारके सर्वांसाठी प्रेरणास्थळे ठरत आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेला डॉ. आंबेडकर यांचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस’ म्हणून ओळखला जातो.
लंडनचे निवासस्थान पर्यटकांचे आकर्षण
डॉ. आंबेडकर १९२१-२२ या काळात लंडनमध्ये ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ते निवासस्थान आज जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. २०१५ मध्ये या निवासस्थानास स्मारकाचा दर्जा देऊन त्याचे उद्घाटन करण्यात आले.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र : दिल्लीतील जनपथ भागात २०१७ मध्ये उभारण्यात आलेले डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र आज अभ्यास, संशोधन, विश्लेषण आणि सामाजिक-आर्थिक बदलांच्या धोरण निश्चितीसाठीचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
कनिका हाऊसचे महत्त्व : डॉ. आंबेडकर यांनी कनिका हाऊसमध्ये राहून राज्यघटनेचा मसुदा तयार केला. कायदा मंत्री म्हणून ते याच कनिका हाऊसमध्ये वास्तव्यास होते.
डॉ. आंबेडकर यांच्या नावाने आहेत अनेक विद्यापीठे
डॉ. आंबेडकर यांचा भारताबाहेर सर्वात उंच पुतळा अमेरिकेतील मेरिलँड येथे २०२३ मध्ये उभारण्यात आला. समानतेचा संदेश देणाऱ्या या पुतळ्याची उंची १९ फूट आहे.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, जपानमधील कोयासन, कॅनडातील समिन फ्रेजर विद्यापीठ आणि ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे पुतळे आज पाहावयास मिळतात.भारतात महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार अशा अनेक राज्यांत आज डॉ. आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठे उभी आहेत.
तेलंगणासह काही राज्यांत डॉ. आंबेडकर यांच्या नावाने राजकीय पक्षही अस्तित्वात आहेत.महूमधील रेल्वे स्टेशन, मुंबईतील मोनोरेल स्टेशन, हैदराबाद व बंगळुरू येथील मेट्रो स्टेशन्सही आज डॉ. आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जातात.