शनिवारी रात्री उत्तर प्रदेश एका भयावह घटनेने पुन्हा एकदा हादरले. प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांची धडाधड गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एकेकाळी प्रयागराजमध्ये आपली दहशत निर्माण करणाऱ्या अतिक अहमदची तितक्याच भयावह पद्धतीने हत्या करण्यात आली. एकेकाळी माफिया अतिक अहमद याची दहशत एवढी होती की, कुणीही त्याच्याविरोधात ब्र काढण्याची हिंमत करत नसे. मात्र एक वर्ष असं आलं आणि त्यात अशी काही पटकथा लिहिली की, ज्याची कल्पना अतीक किंवा राज्यातील कुणीही केली नव्हती.
या कहाणीची सुरुवात झाली होती ती २००४ मध्ये. २००४ मध्ये बसपाच्या तिकिटावर राजू पाल यांनी अतिक अहमदचा धाकटा भाऊ मोहम्मद अश्रफविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अश्रफचा पराभव केला. त्यानंतर २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल याची हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप अतिक आणि अश्रफसोबत माफियाच्या गँगमधील इतर लोकांवर झाला. या हत्याकांडामध्ये उमेश पाल हा साक्षीदार होता.
२००६ मध्ये अतिक अहमदने उमेशचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्याबरोबरच राजू पाल हत्याकांडामध्ये अतिकने उमेशकडून आपल्याबाजूने साक्षही देऊन घेतली होती. मात्र नंतर उमेश पालने अतिक अहमदविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणात यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल कोर्टात हजर झाला होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये अतिक अहमदकडून युक्तिवाद होणार होता. मात्र अतिकच्या शूटर्सनी उमेश पालची हत्या केली. या हत्येवरून उत्तर प्रदेशात मोठा गदारोळ उठला होता.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये माफियाला जमीनदोस्त करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आक्रमक कारवाई करत आरोपींविरोधात मोर्चा सांभाळला होता. तसेच हत्याकांडाच्या तिसऱ्या दिवशीच पोलिसांनी पहिला एन्काऊंटर केला. त्यामध्ये अरबाझ नावाच्या गुंडाला ठार करण्यात आले. हा एन्काऊंटर नेहरू पार्कमधील जंगलांमध्ये झाला होता.
यापूर्वी ६ मार्च रोजी या प्रकरणातील आणखी एक आरोपी विजय कुमार उर्फई उस्मान चौधरी एन्काऊंटरमध्ये मारला गेला. पोलीस आणि उस्मान यांच्यात हे एन्काऊंटर प्रयागराजमधील कौंधियारा परिसरात झाले. उस्मान यानेच उमेश पाल याच्यावर पहिली गोळी झाडली होती.
त्यानंतर १३ एप्रिल रोजी आणखी दोन शूटरची हत्या करण्यात आली. या एन्काऊंटरमध्ये अतिक अहमदचा मुलगा मारला गेला. मुलाच्या मृत्युमुळे अतिक अहमदला मोठा धक्का बसला होता. यादरम्यान, अतिक अहमद प्रसार माध्यमांसमोर आला होता. मात्र त्याने काही बोलण्यास नकार दिला. कारण मुलाच्या हत्येमुळे तो पुरता खचून गेला होता.
मात्र या सर्व घटनाक्रमामध्ये दोन दशकांपूर्वी राजू पाल हत्याकांडामुळे वादात सापडलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची अशा प्रकारे हत्या होईल, याची कल्पना कुणीही केली नव्हती. प्रयागराज पोलीस या दोघांनाही मेडिकल तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त भेदत तीन हल्लेखोरांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची हत्या केली. त्यानंतर या हल्लेखोरांनी पोलिसांसमोर सरेंडर केले. मात्र या हत्याकांडामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.