आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकार्यांना निवेदननाशिक : आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपात नियुक्त केलेल्या महिला आशा कर्मचार्यांच्या विविध समस्या व मागण्यांवर तसेच पोषण आहारासाठी नियुक्त केलेल्या महिला बचतगटांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धरणे नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना व आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे व प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आशा महिला कर्मचार्यांना गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही, कागदपत्रांसाठी तसेच विविध दाखल्यांच्या छायांकित प्रत काढण्यासाठी पदरमोड करावा लागतो यासह विविध मागण्यांचा पाढाच यावेळी संघटनेच्या महिला पदाधिकार्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्यापुढे मांडला. त्यावर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुटू शकणार्या समस्या व मागण्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन डॉ. वाकचौरे यांनी दिले. तसेच शासनस्तरावरील मागण्यांबाबत शासनाकडे अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना त्यांच्या विभागाशी निगडीत विविध समस्या व मागण्यांचे निवेदन दिले. तसेच पोषण आहारासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनात कल्पना शिंदे, मीराबाई सोनवणे, साधना झोपे, लीलावती लांडगे, गीता पासी, लताबाई टिळे यांच्यासह महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
आशा कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By admin | Published: March 24, 2015 12:21 AM