इम्फाळ : मणिपूरमध्ये प्रथमच मुसंडी मारत भाजपने सरकार स्थापण्यासाठी चाचपणी चालविली आहे. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपने रालोआच्या तीन आमदारांचे समर्थन लाभल्याचा दावा केला आहे.
मणिपूरच्या ६० सदस्यीय विधानसभेत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना ३१ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्रिशंकू विधानसभेत सर्वाधिक २८ जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे. २१ जागा पटकावणाऱ्या भाजपनंतर नॅशनलिस्ट पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ईशान्य लोकशाही आघाडीने प्रत्येकी चार काबीज केल्या. रालोआचा घटक पक्ष असलेला एलजीपी, तृणमूल काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
एनपीपी-४, लोजपा-१ हे स्वतंत्ररीत्या लढले असले तरी रालोआत घटक पक्ष आहेत. आम्ही तृणमूल काँग्रेस आणि अपक्ष आमदारासोबत चर्चा करू, असे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार भाजपचे नेते एन. बीरेन यांनी पत्रकारांना सांगितले. ईशान्येत भाजपला अभूतपूर्व यश आसाममध्ये भाजपने २०१६ मध्ये धक्कादायक विजय मिळविला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या ईशान्येत या पक्षाने आपले पाय भक्कमपणे रोवले असल्याचे मणिपूरच्या निकालाने स्पष्ट केले आहे. एनपीएफचे काँग्रेसेतर पक्षाला समर्थन...मणिपूरची काँग्रेसपासून मुक्तता करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आम्ही काँग्रेसेतर पक्षाला समर्थन देणार असल्याचे नागा पीपल्स फ्रंटने (एनपीएफ) रविवारी स्पष्ट केले. या पक्षाने चार जागा पटकावल्या आहेत. आम्ही रालोआचा भाग असून काँग्रेसेतर पक्षांच्या ईशान्य लोकशाही आघाडीला समर्थन देणार आहोत, असे एनपीएझचे प्रवक्ते ए. किकोन यांनी म्हटले.