मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासमोरच काँग्रेसचे खारदार डी.के. सुरेश आणि राज्यमंत्री अश्वथ नारायण आपसात भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:46 PM2022-01-03T18:46:22+5:302022-01-03T18:47:00+5:30
Karnataka Politics News:
बंगळुरू - कर्नाटकमधील रामनगरमध्ये सोमवारी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच मंचावर काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश आणि राज्य सरकारमधील मंत्री अश्वथ नारायण नारायण हे आपसात भिडले. दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमोरच हमरी-तुमरी झाली. अखेरीच दोघांमधील वाद संपवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली.
कर्नाटकमधील रामनगर येथे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मंचावर राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, राज्यमंत्री अश्वथ नारायण हे उपस्थित होते. मंत्री नारायण मंचावर भाषण देत होते. ते रामनगरमध्ये सरकारकडून करण्यात येणारी विकास कार्ये जनतेसमोर मांडत होते. त्याचदरम्यान, काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली.
त्यानंतर खासदार डी.के. सुरेश आपल्या जागेवरून उठून मंत्री अश्वथ नारायण यांच्याजवळ गेले. त्यानंतर दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. हा वाद एवढा वाढला की, मंचावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. आश्चर्यकारक बाब म्हणजे हा वाद सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा मंचावर मुख्यमंत्री बोम्मई उपस्थित होते.