ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 2 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणा-या सुरक्षा यंत्रणांसमोर बेडरुम जिहादींच्या रुपाने नवं आव्हान उभं राहिलं आहे. सुरक्षा यंत्रणा सध्या या शत्रुसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहे. हे शत्रू सुरक्षितपणे घरात लपून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत आहेत. तरुणांना टार्गेट करत त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न हे करत असतात. वरिष्ठ अधिका-यांनी सांगितल्यानुसार हे नवं युद्द आणि युद्दाची नवी जागा आहे. मात्र नेहमीच्या पारंपारिक युद्धाप्रमाणे यामध्ये कोणतंही शस्त्र न वापरता लढायचं आहे. नव्या जमान्यातील हे जिहादी युद्द सुरु करण्यासाठी कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन्सचा वापर करत आहेत. काश्मीरमध्ये किंवा बाहेर, आपल्या घरी किंवा रस्त्यावर, एखादा कॅफे किंवा फुटपाथ कुठेही बसून हे केलं जाऊ शकतं.
जातीय दंगलीची भीती
सुरक्षा यंत्रणांना 29 जूनपासून सुरु होणा-या अमरनाथ यात्रेची सर्वात जास्त चिंता लागली आहे. जिहादी व्हाट्सअॅप, फेसबूक आणि ट्विटरचा वापर करत 40 दिवसांची ही तीर्थयात्रा सुरु होण्याआधीच खो-यात जातीय दंगली भडकवतील अशी भीती आहे. "हे एक आभासी युद्ध असून येथे शब्दांचं शस्त्र करुन लढाई लढली जाते. याचा परिणाम तरुणांवर होतो", असं एका पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. अनेक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार येणा-या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरात अनेक अफवा पसरवल्या जाऊ शकतात, आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी आमच्याकडे फार कमी वेळ आहे.
"आपल्या घरात पलंग किंवा सोफ्यावर बसून कोणीही हजारो चॅट ग्रुप्सवर असं काहीही टाकू शकतो ज्यामुळे राज्यात जातीय हिंसा भडकेल", असं एका पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
धोकादायक म्हणजे अशा प्रकारचे सोशल चॅट ग्रुप फक्त जम्मू काश्मीरच नाही तर राजधानी दिल्लीसह अन्य राज्य आणि विदेशातही सक्रिय आहेत.
अधिका-यांनी या शत्रुशी लढणं सोपं नाही सांगताना एका काश्मीर पंडित कॉन्स्टेबलचं उदाहरण दिलं आहे. हा कॉन्स्टेबल बेपत्ता झाला होता. खूप शोध घेतल्यानंतर 90 किमी अंतरावर कुपवाडामध्ये त्याचा मृतदेह सापडला. तपास केला असता समोर आलं की, काश्मीरी पंडितांनी अशा काही पोस्ट टाकण्यास सुरुवात केली होती ज्यामध्ये दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण करुन हत्या केली असा दावा करण्यात आला होता. मात्र नंतर तपास केला असता त्याच्याच एका सहका-याने हत्या केल्याचं समोर आलं.