ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात केली असतानाच आता देशातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १८६ कलाकारांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवत एफटीआयआयला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
गजेंद्र चौहान यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ ठरली असून हा वाद दिवसेगणिक चिघळतच आहे. गुरुवारी एफटीआयआयच्या तिघा विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १८६ कलाकारांनी थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले आहे. एफटीआयआयला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावे व सिनेनिर्मात्यांची स्वतंत्र समिती अशी मागणी या कलाकारांनी केली आहे. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. प्रशासनाने ही मागणी समजून घ्यावी पण दुर्दैवाने सरकार विद्यार्थ्यांना आरोपीच्या पिंज-यात उभं करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी केली आहे. विद्या बालन, राजकुमार राव, अंजुम राजाबली आणि श्रीराम राघवन या मंडळींनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.