मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकांआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मोठा धक्का बसला आहे. सेबीने विजय रूपाणी यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. पुढील 45 दिवसांमध्ये त्यांना हा दंड भरावा लागणार आहे. रूपाणी यांच्या हिंदू अविभाजीत कुटुंब (HUF) या कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. सारंग केमिकल्स नावाच्या कंपनीसोबत व्यापारात अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय अन्य 22 कंपन्यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
या सर्व 22 कंपन्या आणि त्यांची बॅंक खाती एकमेकांशी जोडलेली असल्याचं सेबीला चौकशीत समजलं. या कंपन्यांनी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी एक-दुस-याच्या शेअर्सचा व्यवहार केला. या सर्वांना 6.9 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जानेवारी 2011 ते जून 2011 च्या दरम्यान रूपाणी यांच्या कंपनीने हेरा-फेरी केली होती असं सेबीच्या चौकशीत समोर आलंय.
यापूर्वी सेबीने मे 2016 मध्ये एक नोटीस जारी करून या 22 कंपन्यांनी सेबीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हटलं होतं. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून18 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.