इंधन दरवाढीची झळ अमित शहांपर्यंत; दिलासा देण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 08:15 PM2018-09-15T20:15:52+5:302018-09-15T20:17:02+5:30
देशात पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली असताना किंमती कमी करण्यास आढेवेढे घेणाऱ्या भाजपला आता महागाईची झळ बसू लागली आहे.
हैदराबाद : देशात पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली असताना किंमती कमी करण्यास आढेवेढे घेणाऱ्या भाजपला आता महागाईची झळ बसू लागली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज हैदराबादमध्ये इंधनाचे दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण आणि लोकांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उपाय शोधत असल्याचे सांगितले.
मुंबईमध्ये आज पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 25 पैशांनी वाढले. यामुळे 89.01 आणि डिझेल 78.07 रुपयांनी विकले जात आहे. हा दर आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. या वाढत्या दरांमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली असून सत्ताधाऱ्यांमध्येही खळबळ माजली आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकार या दरवाढीला आंतरराष्ट्रीय परिस्थिती जबाबदार असल्याचे सांगत आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर चार वर्षांपूर्वीचे काँग्रेसचे सरकार कारमीभूत असल्याचे आज सांगितले. पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी होत असताना काही अर्थमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. तर भाजपशासित राज्यांनीही व्हॅट कमी करण्यास नकार दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आज अमित शहा यांनी हैदराबादमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया भाजप आणि सरकारसाठी चिंतेचा विषय बनला असल्याचे सांगितले. अमेरिका-चीन दरम्यानचे व्यापार युद्ध, इंडोनेशिया, इराणवरील बंधने ही कारणे यामागे असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकार लवकरच काही निर्णय घेईल, असेही शहा यांनी सांगितले.