नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले होते. त्यातून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात केली होती. परंतु राज्य सरकारनं डिझेलचे दर जैसे थेच ठेवले होते. त्यानंतर राज्य सरकारनंही डिझेलच्या दरातही 1.5 रुपयांची कपात केल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेली कपात मिळून डिझेल 4 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र आता दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं आहे.
मुंबईत शनिवारी (6 ऑक्टोबर) पेट्रोल 18 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे तर डिझेल 70 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.15 तर डिझेलचा प्रति लिटर दर 76.75 झाला आहे.
(सौजन्यः डिझेल प्राइज डॉट कॉम)
राजधानी दिल्लीत पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 81.68 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.24 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा इंधन दरवाढ होताना दिसत आहे.