नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दराचा भडका सुरूच आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोल प्रतिलिटर 90.75 रुपयांवर गेलं आहे. तर डिझेलच्या दरातही 22 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रतिलिटर डिझेलसाठी आता 79.23 रुपये मोजावे लागणार आहेत. इंधनाच्या दरात होत असलेल्या वाढीनं जनता अक्षरशः त्रासली आहे. अद्यापही या दरवाढीतून मोदी सरकारनं सामान्यांना दिलासा दिलेला नाही.मुंबईबरोबरच राजधानी दिल्लीतही इंधनाचे दर भडकले आहेत. राजधानीतही पेट्रोलचा दर 22 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 83.40 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात 21 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिलिटर डिझेलसाठी दिल्लीकरांना 74.63 रुपये मोजावे लागणार आहेत. इंधनासह गॅस आणि भाजीपाल्याचे दर वाढत असल्यानं सामान्य जनतेच्या हालाला पारावार उरला नाही आहे.चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच वाढले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण नोंदवली गेली होती. तसेच 6 जुलै ते 25 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे चढेच होते. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महागलं आहे. पण केंद्र व राज्य सरकारचे भरमसाट करसुद्धा या दरवाढीला कारणीभूत आहेत. कच्चे तेल महाग होत असतानाही दोन्ही सरकारं कर कमी करून जनतेला दिलासा देण्यास तयार नाहीत. त्यातून दर भडकत असून, महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे.
इंधन दरवाढीचा भडका सुरूच! मुंबईत पेट्रोल 90.75 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:44 AM