नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत रविवारी (30 सप्टेंबर) पेट्रोल 9 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 17 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 90.84 तर डिझेलचा प्रति लिटर दर 79.40 झाला आहे. सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.
(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
राजधानी दिल्लीत पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 16 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 83.49 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 74.79 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच वाढले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण नोंदवली गेली होती. तसेच 6 जुलै ते 25 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे चढेच होते. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महागलं आहे. पण केंद्र व राज्य सरकारचे भरमसाट करसुद्धा या दरवाढीला कारणीभूत आहेत. कच्चे तेल महाग होत असतानाही दोन्ही सरकारं कर कमी करून जनतेला दिलासा देण्यास तयार नाहीत. त्यातून दर भडकत असून, महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे.