मुंबई - सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 40 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 85.93 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 37 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 77.96 रुपयांवर आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दरात घट होत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. सध्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. तसेच पुढील काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांनाही सत्ताधारी भाजपला सामोरे जायचे असल्याने इंधनाच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकार चिंतेत होते. यामुळे गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन पुरवठादार कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर इंधनाच्या दरांमध्ये घसरण पहायला मिळत आहे.