आइजोल – आसामसोबत सुरु असलेल्या सीमावादानंतर आता मिझोरामध्ये इंधनाचा तुटवडा भासू लागला आहे. मिझोराम सरकारने इंधनाचा अभाव असल्याचं लक्षात येताच राज्यातील प्रत्येक वाहनांना ठराविक इंधन पुरवठा करण्याचं निश्चित केले आहे. सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधाप्रमाणेच वाहनांना पेट्रोल-डिझेलचं वाटप करण्यात येणार आहे. मिझोराममधील नॅशनल हायवे ३०६ बंद झाल्यानं राज्यात इंधनाचा तुटवडा (Mizoram Stares At Fuel Shortage) जाणवू लागला आहे.
वाहनांना मिळणार केवळ इतकचं पेट्रोल-डिझेल
मिझोराम सरकारच्या निर्णयानुसार, १२, ८ आणि ६ चाकांच्या वाहनांना जास्तीत जास्त ५० लीटर इंधन दिलं जाईल. मीडियम मोटर वाहन उदा. पिकअप याला सर्वाधिक २० लीटर इंधन दिलं जाईल. त्याशिवाय स्कूटरला ३ लीटर, बाईकला ५ लीटर आणि कारमध्ये जास्तीत जास्त १० लीटरपर्यंत इंधनाचा पुरवठा करण्यात येणार आहे.
पेट्रोल पंपांना मिझोराम सरकारचे आदेश
आसामसोबत सुरु असलेल्या सीमावादानंतर मिझोराम राज्यात अन्न आणि इतर गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल पंपांना निर्धारित आदेशाप्रमाणेच वाहनांना इंधनाचा पुरवठा केला जावा असे आदेश दिले आहेत. त्याचसोबत कुणालाही कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल पुरवलं जाणार नाही. जी वाहनं पेट्रोल पंपावर आली आहेत त्यालाच इंधन द्यावं असं आदेशात म्हणत मिझोराम सरकारनं पेट्रोलच्या काळा बाजारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पेट्रोल पंपाकडे किती इंधन शिल्लक आहे याचा रिपोर्ट दरदिवशी सरकारला सोपवावा असं म्हटलं आहे.
आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला
२६ जुलै रोजी आसाम आणि मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांचे पोलीस आणि सुरक्षादल एकमेकांसमोर येऊन झालेल्या गोळीबार आणि झटापटीत काही पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. यावरून मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात FIR दाखल केला असून, झटापट, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची सांगितले जात आहे. याशिवाय २०० अज्ञात पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.