- नामदेव मोरेनवी मुंबई : पीएनबी बँकेच्या जवळपास १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या देशभरातील मालमत्तेच्या झाडाझडतीत रायगड जिल्ह्यातील २६ एकर जमिनीचा तपशील आतापर्यंत उघड झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल मागविला आहे. ही जमीन मुंबई-गोवा महामार्गाजवळ असून तेथे फळझाडांची लागवड करण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. याशिवाय गीतांजली जेम्सच्या नावे शेकडो एकर जमीन असल्याचा तपशील सरकारी यंत्रणांना समजला असून त्याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे.‘गीतांजली जेम्स’चा मालक असलेल्या चोक्सीच्या गैरव्यवहारातील रक्कम वसूल करण्यासाठी सध्या त्याची देशभरातील कार्यालये, मालमत्तांवर छापे टाकण्याची आणि त्यांचे मूल्यांकन करण्याची कारवाई सुरू आहे. काही मालमत्ता सीलही करण्यात आल्या आहेत. मात्र, आजवर त्याच्या नावावरील शेतजमिनीवर कारवाई झाली नव्हती. ती आता सरकारी यंत्रणेने सुरू देली आहे. पनवेल तालुक्यातील २५ सात-बाराच्या उताºयावर मेहूल चिनूभाई चोक्सीचे नाव असल्याचे निदर्शनास आले आहे. चिरवत गावात २० एकर आणि तुरमाळे, सांगुर्ली गावात त्याची उरलेली जमीन आहे. रायगडचे जिल्हाअधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पनवेलच्या उपविभागीय महसूल अधिकाºयांना ही माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी चोक्सीच्या जमिनींचा अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या चिरवत गावातील जमिनीला कुंपण घालून आत फार्महाऊस बांधण्यात आले आहे. या जमिनीवर पीएनबी बँकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. सांगुर्ली व तुरमाळे गावांत प्रत्येकी तीन एकरांपेक्षा जास्त जमीन चोक्सीच्या नावावर असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्याच्या हिरे कंपनीच्या नावेही शेकडो एकर जमिनी खरेदी केल्याचे समजल्याने महसूल विभागाने या व्यतिरिक्त अजून कुठे जमीन आहे का? याच्याही चौकशीला सुरुवात केली आहे.किंमत कोट्यवधींच्या घरातपनवेल तालुक्यातील ‘नैना’ कार्यक्षेत्रातच मेहूल चोक्सीच्या नावावरील २६ एकर जमिनींचा तपशील उघड झाला आहे. सध्या तेथे किमान पाच लाख रुपये गुंठा या दराने जमिनीला भाव मिळत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावरून चोक्सीच्या नावावरील जमिनीची अंदाजे किंमत ५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते.मेहुल चोक्सीच्या प्रकरणांत पनवेल उपविभागीय महसूल अधिकाºयांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येत आहे. पूर्ण तपशील उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबत शासनाच्या आदेशानुसार आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येईल.- डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड
फरार आरोपी मेहुल चोक्सीची रायगडमध्ये शेकडो एकर जमीन, मालमत्तेची झाडाझडती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:43 AM