नवी दिल्ली : भारतात हजारो कोटींची कर्जे बुडवून विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे 31 उद्योगपती परदेशात फुर्रर झाले आहेत. गुजरातच्या बडोद्यातील अशाच एका औषध कंपनीच्या मालकाला तब्बल 5 हजार कोटींचा बँक घोटाळा केल्या प्रकरणात दुबईत अटक करण्यात आली आहे.
नितीन संदेसरा असे या ठगाचे नाव असून त्याने व त्याचा भाऊ चेतन याने आंध्रा बँकेद्वारा चालविण्यात येत असलेल्या बँकांच्या समुहाला 5 हजार कोटींचा चुना लावला आहे. नितीन याच्या अटकेमुळे या घोटाळ्याशी असलेले राजकीय संबंधही उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितीन याच्याविरोधात उच्च न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट काढला होता. या आधारावर दुबईच्या पोलिसांनी त्याला अटक केली. दुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
नितीन संदेसरा हा बँकांना चुना लावून परदेशात पलायन केलेल्या 31 उद्योगपतींपैकी एक आहेत. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वीच दोन्ही भाऊ आपल्या परिवारांसह गेल्या वर्षीच देश सोडून पळाले होते. इडीदेखील या दोघांच्या मागावर होती. तसेच त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती.