Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:31 AM2021-07-22T09:31:21+5:302021-07-22T09:33:24+5:30
Kerala Full Lockdown : केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. पुन्हा होणार संपूर्ण लॉकडाऊन.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये आता दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. परंतु सध्या केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु केरळमध्ये २४ आणि २५ जुलै रोजीच लॉकडाऊन लागू राहणार आहे. दरम्यान २४ आणि २५ जुलै रोजी १२ आणि १३ जून रोजी जारी करण्यात आलेलेच निर्देश लागू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
केरळमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये गेल्या २५ दिवसांमधील सर्वाधिक १६,८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ५ जून रोजी राज्यात १७,३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, संपूर्ण देशात नव्या रुग्णांच्या झालेल्या नोंदीपैकी ४० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण हे केरळमध्येच सापडले आहेत. पूर्वेकडे मिझोरममध्ये आतापर्यंत ८०६ आणि मणिपूरमध्ये ११२७ रुग्णांची नोंद झाली आहे.
There will be a complete lockdown on 24th and 25th July 2021 (Saturday and Sunday) with the same guidelines as issued for 12th and 13th June 2021: Government of Kerala pic.twitter.com/U82uLBsh2g
— ANI (@ANI) July 21, 2021
सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
यापूर्वी मंगळवारी बोलताना पिनराई विजयन यांनी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले नियम हे आठवड्याभरासाठी कायम राहणार असल्याचं म्हटलं होतं. सध्या केरळमध्ये संसर्गाचा दर हा १० ट्क्यांपेक्षाही अधिक आहे. दरम्यान, यापूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाचा दर अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयानंही फटकारलं होतं.
आसामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर अधिक असल्यानं लॉकडाऊन काय राहणार आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यू एकाआठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे हरयाणामध्ये निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली असली तरी काही नियम लागू करण्यात आले आहेत.