पुणे : लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांची आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकीटाचे पूर्ण पैसे परत दिले जाणार आहेत. तसेच लॉकडाऊन पूर्वीच तिकीट रद्द केलेल्या व नियमानुसार पैसे कापून परतावा मिळालेल्या प्रवाशांनाही उरलेले पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
देशातील रेल्वे गाड्या दि. २१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहेत. मात्र अनेक प्रवाशांनी किमान १२० दिवस आधीच विविध गाड्यांचे आरक्षण केले होते. त्यातील अनेकांनी कोरोनाचे संकट पाहून या कालावधीतील आरक्षण रद्द केले आहे. हे आरक्षण रद्द करताना त्यांना रेल्वे च्या नियमानुसार रद्द चे शुल्क आकारण्यात आले. तर उर्वरित रक्कम प्रवाशांना देण्यात आली. आता कापून घेण्यात आलेली तिकिटांचे पैसेही परत दिले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित प्रवाशांना अर्ज भरून द्यावा लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.