संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब; विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 06:02 AM2018-12-14T06:02:54+5:302018-12-14T06:03:29+5:30
राफेल, मंदिर, कावेरी पाणीवाटपावरून खडाजंगी
नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराची उभारणी, कावेरी पाणीवाटप तंटा, राफेल विमाने खरेदी व्यवहारामध्ये झालेला कथित घोटाळा, अशा काही मुद्यांवरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातल्याने गुरुवारी लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सलग दुसऱ्या दिवशीही तहकुबीची नामुष्की ओढवली आहे. अयोध्येच्या राममंदिर बांधणीसाठी कायदा करा, अशी मागणी करीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. शिवसेनेचे आनंद अडसूळ म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. मात्र, शिवसेना, भाजप या पक्षांची ज्या विचारांमुळे युती झाली, त्या हिंदुत्वालाच भाजपा विसरला आहे. ज्या महिलांवर त्यांच्या माहितीतील व्यक्तीने बलात्कार केलेला आहे, असे खटले लवकर निकाली काढा, असा मुद्दा भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनी उपस्थित केला.
हक्कांचे रक्षण करा
राज्यसभेत अण्णाद्रमुक व टीडीपीचे सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होऊन जोरदार घोषणा देऊ लागले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी टीडीपीच्या काही खासदारांनी केली.
कावेरी पाणी वाटपप्रकरणी तामिळनाडूच्या हक्कांचे रक्षण करा, असे फलक अण्णाद्रमुकच्या खासदारांनी हाती धरले होते. हा गदारोळ नंतर खूपच वाढल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.