२,५५७ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, सरकारचा दावा फक्त १०४ मृत्यूचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:13 AM2021-05-03T06:13:06+5:302021-05-03T06:13:13+5:30
भोपाळमधील चित्र : संख्या कमी नोंदवली जात असल्याचा आरोप
भोपाळ : भोपाळ जिल्ह्यात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २५५७ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे येथील स्मशानभूमींचे व्यवस्थापक म्हणत असले तरी जिल्ह्यात कोविडमुळे गेल्या महिन्यात फक्त १०४ जणच मरण पावल्याचे राज्य सरकार म्हणत आहे.
२५५७ आणि १०४ या आकड्यांतील प्रचंड तफावत शहरात कोविड-१९ मुळे मरण पावलेल्यांची नोंद कमी केली गेली या दाव्याला दुजोरा देणारी आहे. दोन स्मशानभूमींचे व्यवस्थापक आणि भोपाळमधील कब्रस्तानच्या अध्यक्षाने सांगितले की, भोपाळ जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २५५७ जणांसह ३८११ जणांवर गेल्या महिन्यात अंत्यसंस्कार केले गेले.
राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यात कोविडमुळे मरण पावलेल्यांची खरी संख्या नोंद करीत नाही या आरोपांचा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकताच इन्कार केला होता. जिल्ह्यात झाडा कब्रस्तान आणि भडभडा स्मशानभूमीला कोविड-१९ मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार दिले गेले होते, असे अधिकारी म्हणाला. नंतर कोविड-१९ मृतांची संख्या वाढल्यामुळे सुभाषनगर विश्राम घाट स्मशानभूमीतही कोविड-१९ मृतांवर अंत्यसंस्कार केले जाऊ लागले. सुभाष नगर विश्राम घाट स्मशानभूमीचे व्यवस्थापक शोभराज सुखवाणी म्हणाले की, या स्मशानभूमीत गेल्या महिन्यात १३८६ जणांवर अंत्यसंस्कार केले गेले. त्यात ७२७ जण हे कोविड-१९ मुळे मरण पावलेले होते.”
गतमहिन्यात २ हजारांहून अधिक अंत्यसंस्कार
गेल्या महिन्यात दोन हजार ५२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात १६५४ जण कोरोनाबाधित होते, असे भडभडा विश्राम घाट स्मशानभूमीचे सचिव ममतेश शर्मा म्हणाले. हे १६५४ मृतदेह कोरोनावरील उपचार केंद्रांवरून हवाबंद प्लॅस्टिक पिशव्यांत घालून थेट स्मशानभूमीत पाेहोचविण्यात आले होते व त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.