उत्तर प्रदेश: उन्नाव येथील सामूहिक बलात्कारानंतर पेटवून दिल्यामुळे नवी दिल्लीत रुग्णालयात मरण पावलेल्या २३ वर्षीय तरुणीवर अत्यंत कडक बंदोबस्तात रविवारी तिच्या येथील मूळ खेड्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या आजी, आजोबांची कबर (मझार) असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतात तिचे दफन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सर्व स्तरांतील स्थानिक रहिवासी आणि अधिकारी उपस्थित होते.
समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमल राणी वरुण हेदेखील उपस्थित होते. त्या मुलीला ज्या संकटाला तोंड द्यावे लागले त्यातील आरोपींना कठोर शिक्षा होईल, असे प्रयत्न आम्ही करू, असे राणी वरुण म्हणाले. समाजवादी पक्षाचे आमदार सुनील सिंह साजन यांनी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आज मुलींना सुरक्षित वाटत नाही व त्यांनी दिलेली तक्रारही दाखल करून घेतली जात नाही. योगी आदित्यनाथ सरकारने राजीनामा दिला पाहिजे.
लखनौचे विभागीय आयुक्त मुकेश मेश्राम यांनी वार्ताहरांशी बोलताना मृत मुलीच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाईल व त्यांना प्रधान मंत्री आवास योजनेत घरही दिले जाईल, असे सांगितले. पीडितेच्या बहिणीलाही स्वतंत्र संरक्षण दिले जाईल. कारण त्या घटनेची ती साक्षीदार आहे. ते कुटुंब ज्याची निवड करील त्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल. नोकरीशिवाय या कुुटुंबातील जर कोणा सदस्याला स्वसंरक्षणाच्या दृष्टीने शस्त्र परवाना हवा असल्यास नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून ते दिले जाईल, असे मेश्राम म्हणाले. तत्पूर्वी, मृत मुलीच्या बहिणीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिच्या खेड्यात येऊन आरोपींना कठोर शिक्षेची खात्री देत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे म्हटले होते.