नवी दिल्ली: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि 11 अधिकाऱ्यांना वीरमरण प्राप्त झाले. या अपघातात प्राण गमावलेले ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर यांच्यावर दिल्लीतील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीने त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.
पतीला अखेरचा निरोप देताना ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ब्रिगेडियर एलएस लिड्डर हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार होते. देशाने आज ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिड्डरसारख्या वीर पुत्राला कायमचे गमावले आहे. दिल्ली छावणीतील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत पूर्ण लष्करी सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांना हसत-हसत निरोप द्यायला हवा...यावेळी ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पत्नी गीतिका म्हणाल्या, 'हे माझ्यासाठी कधीही न भरुन निघणारे दुःख आहे. पण मी एका सैनिकाची पत्नी आहे, त्यामुळे हसत-हसत त्यांना निरोप द्यायला हवा. आयुष्य खूप मोठं आहे, देवाच्या मर्जीविरोधात आपण काही करू शकत नाही. ते खूप चांगले पती आणि पिता होते. मुलीला त्यांची खूप आठवण येईल.'
माझे वडील हिरो होतेब्रिगेडियर लिड्डर यांची मुलगी आशना म्हणाली, 'मी आता 17 वर्षांची होणार आहे, माझे वडील 17 वर्षे माझ्यासोबत राहिले. आता पुढील आयुष्य आम्ही त्यांच्या चांगल्या आठवणींसोबत जगू. माझे वडील माझे चांगले मित्र आणि खरे हिरो होते. कदाचित नशिबाला हेच मान्य असेल.'