ऑनलाइन लोकमत -
वरंगल (तेलंगणा), दि. 07 - आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास मुलाने नकार दिल्यानंतर धर्माची बंधनं जुगारत मुस्लिम महिलेने हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याची घटना वरंगल जिल्ह्यात घडली आहे. कुटुंबाने सांभाळण्यास नकार दिल्यानंतर श्रीनिवास वृद्धाश्रमात राहत होते. मंगळवारी त्यांचं निधन झाले. पण मुलाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर वृद्धाश्रम चालवणा-या याकूब बी यांनीच सर्व अंत्यविधी करत अंत्यसंस्कार केले.
याकूब बी आपल्या पतीसोबत वृद्धाश्रम चालवतात. या वृद्धाश्रमात 70 हून अधिक वृद्धांची देखभाल केली जाते. विेशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. दोन वर्षापुर्वी श्रीनिवास एका बसस्टॉपवर सापडले होते. त्यांना लकवादेखील झाला होता. कुटुंबाने घराबाहेर काढल्याने त्यांच्या डोक्यावरच छत गेलं होतं. 70 वर्षीय श्रीनिवास यांचं मंगळवारी निधन झालं.
मंगळवारी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाची याकूब बी यांना माहिती मिळाली होती. त्यांचा मुलगा शरथ अंत्यसंस्कारासाठी हजर राहिला होता, पण अंत्यसंस्कार करण्यास त्याने नकार दिला. धर्मांतरण करुन ख्रिश्चन धर्म स्विकारला असल्याने त्या धर्मात अंत्यसंस्कार करत नाही असं सांगत त्याने हिंदू विधी करण्यास नकार दिला. याकूब बी यांचे पती प्रवासात होते. याकूब बी श्रीनिवास यांना वडिल मानत होत्या. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करत मुखाग्नी दिला.