ऑनलाइन लोकमत
धारवाड, दि. १२ - लान्सनायक हनुमंतअप्पा कोपड यांच्यावर कर्नाटकमदील बेटदूर या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीनमधील हिमस्खलनाच्या दुर्घटनेतून ६ दिवसांनी बचावलेले हनुमंतअप्पा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारे हनुमंतअप्पा यांचे गुरूवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास निधन झाले आणि संपूर्ण संपूर्ण देश हळहळला.
३ फेब्रुवारीला १९,६०० फूट उंचीवरील सियाचीनमध्ये हिमकडे कोसळल्यामुळे ‘१९ मद्रास बटालियन’चे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. सियाचीनच्या बर्फाच्छादीत भागात बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशिरा हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते. यानंतर लगेच त्यांना खास एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून हनुमंतअप्पा यांचे प्राण वाचविण्यासाठी येथील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न चालवले होते. पण गुरुवारी हनुमंतअप्पांची प्रकृती आणखीच खालावली आणि ११.४५च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी संध्याकाळी लष्कराच्या जवानांनी दिल्लीतील ब्रार स्क्वेअर येथे त्यांना सलामी दिली.
त्यानंतर काल संध्याकाळी उशीरा त्यांचे पार्थिव हुबळी विमानतळावर आणण्यात आले व कर्नाटक इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेच्या इमारतीत रात्रभर ठेवण्यात आले. आज सकाळी नेहरू स्टेडियम येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले. त्यानंंतर बेटदूर या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिगरबाज हनुमंतप्पा
कर्नाटकच्या धारवाडच्या बेटादूर गावात राहणारे हनुमंतअप्पा १३ वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते. लष्करातील आपल्या एकूण १३ वर्षांच्या सेवेपैकी सलग १० वर्षे त्यांनी अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात कर्तव्य बजावले. जोखमीच्या मोहिमांसाठी सतत सज्ज असलेला आणि उच्च ध्येयाने भारावलेला जवान अशी हनुमंतअप्पांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी महादेवी अशोक बिलेबन आणि दोन वर्षांची मुलगी नेत्रा असा परिवार आहे.