भिवानी / नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’साठी आत्महत्या करणारे माजी सैनिक रामकिशन गरेवाल यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळगावी प्रचंड बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक राजकीय नेते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. हरियाणातील बामला या गावी त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिलावर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी ‘रामकिशन अमर रहे’च्या घोषणा दिल्या जात होत्या. ७० वर्षीय माजी सैनिक रामकिशन गरेवाल हे सरपंचही होते. राहुल गांधी यांनी गरेवाल कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर, नेत्या किरण चौधरी, कुलदीप बिश्नोई, कमलनाथ, रणदीपसिंह सुरजेवाला आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन हेही उपस्थित होते. भाजपचे खासदार रतनलाल कटारिया, हरियाणातील मंत्री कृष्णलाल यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर ते निघून गेले. >दिल्ली सरकारतर्फे एक कोटीची मदतदिल्लीचे मुुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी सैनिक राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. केजरीवाल म्हणाले की, गरेवाल यांची ही लढाई पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू आणि केंद्र सरकारकडून ओआरओपी घेऊनच राहू. सैनिकांचा तो अधिकार आहे. यावर राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, होय, आम्ही राजकारण करीत आहोत आणि सैनिकांना त्यांचा अधिकार देण्यासाठी हे राजकारण करीत राहू.>राज्य सरकारकडून साह्य व नोकरी : हरियाणा सरकारने गरेवाल कुटुंंबियांना दहा लाख रुपये आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.चौकशीची मागणी : गरेवाल यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करीत त्यांचे पुत्र कुलवंत म्हणाले की, या प्रकरणावरून चाललेले राजकारण थांबवा. हे राजकारण का सुरू आहे ते मला माहीत नाही. ओआरओपीसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळे त्यांना शहीद घोषित करावे. वडिलांच्या मृत्यूनंतर दिल्ली पोलिसांनी आमच्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतले आणि मारहाणही केली, असा आरोप कुलवंत यांनी केला आहे.>मानसिक स्थितीबद्दल मंत्र्यांना शंका गरेवाल यांच्या मानसिक स्थितीचा तपास करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी व्यक्त केले. मात्र, सैनिकाविषयी सहानुभूमी व्यक्त करण्याऐवजी मानसिक अवस्थेविषयी शंका उपस्थित करणे ही विकृती आहे, असे मत काँग्रेसने व्यक्त केले.>नितीशकुमार यांची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुुरुवारी आरोप केला की, केंद्र सरकारची सैनिकांबाबतची दुहेरी भूमिका यातून दिसते. नेत्यांना डांबून ठेवण्याची दिल्ली पोलिसांची कारवाईही अयोग्य होती.>एक लाख माजी सैनिकांना पूर्ण लाभ नाहीकाही तांत्रिक कारणांमुळे अजूनही सेनादलांतील सुमारे एक लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘वन रँक, वन पेन्शन’ (ओआरओपी) योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकलेला नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी सांगितले. ही अडचण लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
रामकिशन गरेवाल यांच्याव प्रचंड बंदोबस्तात अंत्यसंस्कार
By admin | Published: November 04, 2016 6:10 AM