लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘ऐ कब्रिस्तान, तेरे आगोश में इतना सन्नाटा क्यों है.... लोग तो अपनी जान देकर तुझे आबाद करते है’... एका शायरच्या ओळींना तंतोतंत लागू होणारी परिस्थिती सध्या अनुभवायला येत आहे. एरव्ही एकमेकांच्या गळे लागून अश्रू ढाळणारे आणि त्यांना धीर देणाऱ्या लोकांनी गजबजलेली स्मशानभूमी कोरोनाच्या छायेत खºया अर्थाने स्मशान शांतता अनुभवते आहे.या आजाराच्या कळा मृत्यूनंतरही सोसाव्या लागत आहेत. कोरोनाच्या दिल्लीतील पहिल्या बळीच्या अंत्यसंस्कारावरून वाद उद््भवला होता. मृतदेहातून कोरोनाचे संक्रमण होत नाही, हे घसा कोरडा करून सरकारने सांगितले; पण जोखीम कोण पत्करणार? आता या घटनेला जवळपास एक महिना होत आला आहे. आता कोरोनामुळे एकूण १२ लोकांना दिल्लीत प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय दररोज कुणाचे तरी वेगवेगळ्या कारणांनी निधन होते. पण, मृत्यूच्या कारणांचा विचार न करताच लोकांनी अंत्यसंस्काराला जाण्याचे टाळले आहे.सरकारने अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे, पण दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीवर एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला केवळ त्याचा मुलगा उपस्थित होता. तो एकटाच रडत होता आणि त्याला धीर देण्यासाठीही कुणी नव्हते. हे चित्र बघून स्मशानभूमीवरील केअरटेकरलाही गहिवरून आले. लोकांनी स्मशानभूमीवर गर्दी करू नये, याची जबाबदारी असलेले कर्मचारी ही परिस्थिती बघून थक्क झालेआहेत.लोधी रोडवरील विद्युत शवदाहिनीगृहाचा कर्मचारी धरमवीर याने आपले अनुभव एका वृत्तसंस्थेकडे मांडले आहेत. ‘मी गेल्या पंधरा वर्षांपासून इथे आहे, पण अशी अवस्था कधीही बघितली नाही. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला पाच ते आठ लोक असतात. अलीकडेच तर एका व्यक्तीचा मुलगाच उपस्थित होता. त्या मुलाला एकटे रडताना बघून फार वाईट वाटले,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.वक्फ बोर्डाचा पुढाकारच्दिल्ली वक्फ बोर्डाने कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी मिलेनियम पार्कशेजारी स्वतंत्र कब्रस्तान उपलब्ध करून दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाºया लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाºया अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.स्मशानभूमीवर एकमेकांचे गळे लागून धीर देताना मी लोकांना बघतो. पण आज एक ते दोन मीटर अंतरावर उभे राहणारे नातेवाईक-मित्र एकमेकांना धीरसुद्धा देऊ शकत नाहीत, हे चित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे, असे तो म्हणतो.पहाडगंज येथील ख्रिश्चन समुदायाच्या स्मशानभूमीचे कार्यवाहक पेन्जी मॉर्गन स्वत: लोकांना फोन करून गर्दी टाळण्यास सांगत आहेत. काळजावर दगड ठेवून हे काम करावे लागत असल्याचे ते म्हणतात.नोएडात एका ८० वर्षीय व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले; पण त्याचे पार्थिव मूळ गाव असलेल्या कानपूरमध्ये नेता आले नाही. शेवटी चार लोकांच्या उपस्थितीत नोएडातच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. अशा अनेक घटना सध्या समाज अनुभवतोय.
अंत्यसंस्कारालाही घाटावर ‘स्मशान’ शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:48 AM