ऑनलाइन लोकमत
पलवल, दि. 9 - ज्या महिलेचे सासरच्यांनी दोन महिन्यांपूर्वी अंत्यसंस्कार केले ती महिला अचानक माहेरी पोहोचल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. परतल्यावर त्या महिलेने आपल्यासोबत झालेला घटनाक्रम कथन केला आणि सगळेच हैराण झाले.
सासरच्यांनी या महिलेला जबर मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेमध्ये एका जंगलात फेकून दिलं होतं. शुद्धीत आल्यावर या महिलेने भीक मागून आपला दिवस घालवायला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी सासू, सासरा, दिर, ननंद आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला दिल्लीच्या राजीव नगर फेज-3 येथील रहिवासी आहे. 2002 मध्ये पलवल जिल्हयातील खेडला गावातील बृजलाल याच्याशी कविताचं लग्न झालं होतं. कविताला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सासरचे लोकं , नवरा रोज मारहाण करत होते. 22 एप्रिल रोजीही नवरा, सासू-सासरे, ननंद, दीर आणि अन्य दोघांनी कविताला जबर मारहाण केली. जबर मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेमध्ये मेलेली समजून एका रिक्षातून तिला नूंहच्या जंगलामध्ये फेकून देण्यात आलं. यानंतर कविता बेपत्ता असल्याची तक्रारही चांदहाट पोलीस स्थानकात केली.
4 मे रोजी पोलिसांना मेवात या ठिकाणी एक मृतदेह आढळला असता ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचा पती बृजलालला बोलावलं. बृजलालने मृतदेह कविताचाच असल्याचं पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या मंडळीकडे सोपवला. त्यानंतर सासरच्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. कविता आता या जगात नाही या विचाराने सासरची मंडळी निश्चिंत झाली.
जंगलात फेकल्याच्या दोन-तीन दिवसांनंतर शुद्ध आल्यावर मी सर्व भिका-यांमध्ये असल्याचं मला दिसलं. मानसिक परिस्थिती चांगली नसल्याने भिका-यांनी मला भिक मागण्यास भाग पाडलं. काही दिवसाने आपल्यासोबत काय झालं आहे याची मला आठवण झाली आणि खूप प्रयत्नांनतर मी आपल्या घरी पोहोचले. याप्रकरणी कविताने न्यायालयात म्हणणं मांडलं आहे तसंच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचं चांदहट पोलीस स्थानकाकडून सांगण्यात आलं आहे.