नवी दिल्ली : ‘फनी’ वादळाचे रूपांतर सोमवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, ते गुरुवारी कमालीच्या तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल त्यामुळे सरकारने राष्ट्रीय आपदा सहायता दल (एनडीआरएफ) आणि भारतीय किनारा रक्षक दलाला अतिसावध राहण्यास सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाच्या चक्रीवादळाचा इशारा देणाऱ्या विभागाने निवेदनात म्हटले आहे की, हेवादळ सध्या त्रिकोमालीच्या (श्रीलंका) पूर्वेकडे ६२० किलोमीटरवर, चेन्नईच्या (तामिळनाडू) आग्नेय दिशेला ८८० किलोमीटरवर आणिमछलीपटणमच्या (आंध्र प्रदेश) दक्षिण-आग्नेय दिशेला १०५० किलोमीटरवर आहे.
येत्या सहा तासांत हे चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करण्याची आणि पुढील २४ तासांत अतितीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. एक मेच्या सायंकाळपर्यंत हे वादळ वायव्य दिशेकडे सरकण्याची मोठी शक्यता आहे आणि त्यानंतर ते उत्तर- वायव्येकडे हळुहळू मागे वळेल, असे हवामान खात्याच्या निवेदनात म्हटले आहे. हे चक्रीवादळ गुरुवारपर्यंत कमालीचे तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. फनी वादळामुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा आढावा राष्ट्रीय पेचप्रसंग व्यवस्थापन समितीने (एनसीएमसी) सोमवारी घेऊन राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत मिळेल, अशी खात्री दिली. एनडीआरएफ आणि भारतीय किनारा रक्षक दलाला अति सावध राहण्यास सांगण्यात आले असून, मच्छीमारांनी मंगळवारी फनी वादळ तीव्र स्वरूप धारण करण्याची अपेक्षा असल्यामुळे समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे.