जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद व भरभरून प्रेम दिले. यात्रेत बहुसंख्येने लोक बरोबरीने चालले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज या संत-महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली. पुरोगामी महाराष्ट्रातून मोठी ऊर्जा मिळत गेली, या शब्दांत खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रात भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. कृषी साहित्याच्या किमतीतील प्रचंड वाढ, शेतमालाच्या भावातील अनियमितता व फसलेली पीक विमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलले आहे, ही स्थिती पाहून आपण व्यथित झालो. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हताश झालेत. आदिवासींच्या अधिकारावर गदा आलेली आहे.
महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी फुले, शाहू, आंबेडकर, तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांचा जाज्वल्य विचार देशाला दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता करीत असल्याचे पाहून समाधान वाटले. अशा विचाराच्या जनतेने यात्रेला दिलेला प्रतिसाद हा ऊर्जा देणारा ठरणार आहे.
पुरोगामी मातीचा गंध- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पवित्र भूमीतून मध्यप्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध व विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देतो. - प्रेम, प्रतिसाद व आदरातिथ्य यातून मोठी नवीन ऊर्जा घेऊन जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
‘भारत जोडो’ यात्रेचे आज मध्य प्रदेशकडे प्रयाण; काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी (दि. २३) जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आमपाणी कॅम्प येथून सकाळी ६ वाजता मध्य प्रदेशातील बोदरलीकडे प्रयाण करणार आहेत.
आमपाणी-बोदरली हा प्रवास राहुल गांधी व त्यांचे यात्रेकरू हे सुरक्षेच्या कारणावरून वाहनाने करणार आहेत. आमपाणी-बोदरली हा रस्ता सातपुडा पर्वतातून असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात पदयात्रा राहणार नाही. मध्य प्रदेशातील बोदरली येथून त्यांची पदयात्रा पूर्ववत सुरू होईल.