G-20: राजधानी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 परिषदेसाठी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे आगमन सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे विमानदेखील दिल्लीच्या पालम विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. थोड्याच वेळाने जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक होणार आहे.
केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह जो बायडन यांच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर दाखल झाले आहेत. थोड्या वेळानंतर जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार असून, दोघांमध्ये द्वीपक्षीय चर्चा होणार आहे. या बैठकीत विविध करारांवर चर्चा आणि स्वाक्षरी होण्याची माहिती आहे.
जो बायडन यांच्यापूर्वी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. या सर्व नेत्यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या दिल्लीला छावणीचे स्वरुप आले असून, प्रत्येक ठिकाणी पोलिस आणि सैन्याचे जवान तैनात आहेत.