पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्र्यांना सांगितले की, सनातन धर्मावर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला प्रखरपणे विरोध करा. मात्र त्याचवेळी भारत नावासंदर्भात समोर येत असलेल्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जी-२० शिखर संमेलनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी काय करावं आणि काय करू नये, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना सांगितले की, या मोठ्या कार्यक्रमादम्यान, मंत्र्यांनी राष्ट्रीय राजधानीमध्ये थांबावे. तसेच त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली असेल ती त्यांनी योग्यपणे पार पाडावी जेणेकरून दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांना कुठल्याही अडचणी येणार नाहीत. तसेच मंत्र्यांनी भारत मंडपम आणि इतर बैठक स्थळांवर पोहोचण्यासाठी सरकारी वाहनांचा वापर न करता शटल सेवांचा वापर करावा.
सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की, त्यांनी जी-२० शी संबंधित विविध मुद्यांबाबत ज्यांची नियुक्त करण्यात आली आहे, अशाच लोकांना भेटू द्यावे, तसेच स्वत: बोलणे टाळावे. दरम्यान, डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादावर मोदींनी सांगितले की, अशा प्रकारची वक्तव्य करणारे पक्ष आणि त्या पक्षांच्या नेत्यांना उघडे पाडावे. तसेच सत्य जनतेसमोर आणावे. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या सनातन धर्माबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक विधान केलं. तसेच मंत्र्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचं दृढपणे खंडन करण्यास सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रेसिडेंट ऑफ भारत आणि नरेंद्र मोदींचा प्राइम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख केला जात आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी घटनेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा वाद टाळण्याचं आवाहन केलं आहे.