- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असंतुष्ट समूहातील काही मोजक्या नेत्यांशी तडजोड करण्याचा निर्णय घेतला असून, हरियाणातील ज्येष्ठ नेते भूपेंदरसिंग हुडा यांच्याशी सकारात्मक बोलणी झाल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरसाठी गुलाम नबी आझाद यांच्याशी, तर हिमाचल प्रदेशसाठी आनंद शर्मा यांच्याशीही तडजोड केली जाणार असल्याचे समजते.काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आव्हान देणाऱ्या असंतुष्ट समूहातील काही नेत्यांशी नेतृत्व कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगण्यात आले. या नेत्यात कपिल सिबल, विवेक तन्खा आणि पी. जे. कुरियन यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा हे अलीकडे असंतुष्टांच्या बैठकांना फारसे उपस्थित नसले तरी त्यांना राज्यसभेची जागा मिळेल का, याबाबत अनिश्चितता आहे. पृथ्वीराज चव्हाण हेही राज्यसभेवर जाण्याबाबत उत्सुक असले तरी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंग हुडा यांच्याशी पक्ष नेतृत्वाची सकारात्मक बैठक गुरुवारी झाली. प्राथमिक प्रस्तावानुसार, हुडा हे हरियाणाच्या सीएलपीचा राजीनामा देतील. त्यांच्या जागी भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई यांची वर्णी लागेल. हरियाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा यांच्या जागी हुडा यांचे पुत्र दीपेंदरसिंग हुडा यांची वर्णी लागेल. हुडा यांना काँग्रेस कार्यकारी समितीत (सीडब्ल्यूसी) सामावून घेतले जाईल. सीडब्ल्यूसीचे विशेष निमंत्रित असलेले दीपेंदरसिंग हुडा यांच्या जागी कुमारी शैलजा यांची नियुक्ती होईल.
राहुल गांधी यांची हुडा यांच्याशी तडजोड; गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 8:42 AM